अजब राजाची गजब कहाणी...

क्रिकेटमध्ये अनेक रंगीत आणि विक्षिप्त अशी व्यक्तिमत्व होती, आहेत आणि पुढेही असतील. काही व्यक्तिमत्व विक्षिप्त असली तरी ग्रेट असतात आणि काही फक्त विक्षिप्तच असतात. आजची गोष्ट आहे अशीच एका फक्त विक्षिप्त माणसाची. लेफ्टनंट कर्नल पुसापती विजय आनंदा गजापथी राजू उर्फ महाराजकुमार ऑफ व्हिझीअनाग्राम उर्फ व्हिझी.  

हा व्हिझी भारतीय संघाचा कर्णधार होता. भारतीय क्रिकेटने काय काय अत्याचार सहन केलेत! हा एक विनोद आहे. तो एक बॅट्समन होता. हा महाविनोद आहे. आठव्या नम्बरला खेळायला जाणारा माणूस असून असून केवढा मोठा बॅट्समन असणार! तो नंतर कॉमेंटेटर होता. हा प्रचंड मोठा विनोद आहे. तो स्वतःला शिकारी म्हणवायचा. आता ह्या विनोदाला काय म्हणतात हे मला हि माहित नाही. त्याचा असा दावा होता कि त्याने १४० वाघ मारलेत. हे ऐकून रोहन कन्हाई त्याला म्हणाला होता: "खरं कि काय? मला वाटतं तू जंगलात जागोजागी रेडिओ टांगून ठेवले असशील आणि तुझी कॉमेंटरी ऐकून वाघ स्वतःच कंटाळा येऊन मेले असतील". 

रेडिओवर तर त्याचे अनेक किस्से आहेत. एकदा तो स्पष्टपणे रेडिओवर म्हणाला होता कि, "ball is lying flat on the ground"! रोहन कन्हाईने भारताविरुद्ध कलकत्तामध्ये १९५८/५९ साली २५६ धाव केल्या होत्या. व्हिझी तेव्हा रेडिओवर कॉमेंटरी करत होता. कन्हाई मूळचा भारतातला. कन्हाई १०० वर पोहोचला तेव्हा व्हिझीला कुठूनतरी कळलं कि कन्हाईला घरी बाबुलाल म्हणतात. मग पुढच्या सगळ्या कॉमेंटरीमध्ये व्हिझी आपला "Babulal plays cover drive", "Babula plays on leg side" असंच! मग पुढे २०० झाल्यावर ह्या व्हिझीला प्रेमाचं भरतं आलं! कन्हाई नव्हे हा तर कन्हैयाच! हा बाबुलाल कन्हैय्या मुरली वाजवीत वाजवीत २५६ पर्यंत पोहोचला. दया केली त्याने कि आऊट झाला. ३०० केले असते तर ह्या व्हिझीने "कान्हा रे" म्हणत टाहोच फोडला असता.

ह्या झाल्या खूप नंतरच्या गोष्टी. स्वतःला "खेळाडू' म्हणवणाऱ्या व्हिझीचे किस्सेदेखील खूप आहेत. १९३० च्या दरम्यान एखाद्या महाराजाशिवाय भारतीय संघ म्हणजे शिडाशिवाय नौका. संघाचा कप्तान निवडणं म्हणजे पुराणकाळातल्या स्वयंवरासारखा थाट असायचा. राजकुमार आणि महाराजे एकत्र जमा व्हायचे आणि त्यातून एकाच्या गळ्यात कप्तानपदाची पुष्पमाळ घातली जायची. 

व्हिझी - पटियाला शोडाऊन! 

जून २५ - २८, १९३२ साली लॉर्ड्सवर भारताची पहिलीवहिली आंतरराष्ट्रीय टेस्ट मॅच! इंग्लंडच्या दौऱ्यावर जेव्हा हि टीम निघाली होती, तेव्हा महाराजकुमार ऑफ व्हिझीअनाग्राम उर्फ आपल्या आजच्या ब्लॉगचे स्टार व्हिझी आणि महाराजा ऑफ पटियाला ह्यांच्यात आर्थिक ताकदीला घेऊन अटीतटीचा सामना झाला. एक जण दौरा स्पॉन्सर करत होता, तर दुसरा दौऱ्यापूर्वीच्या चाचण्या. दोघांचं अंतिम उद्दिष्ट एकच होतं - भारतीय संघाचं कप्तानपद! 

१९३२ साली महाराजा ऑफ पटियाला यांना कप्तानपद दिलं गेलं आणि व्हिझीला उपकप्तानपद. व्हिझीला हे अजिबात आवडलं नाही. व्हिझी मग मास्टरकार्ड खेळला, आजारामुळे फॉर्म गेलाय हे कारण सांगून, क्रिकेटच्या "हितासाठी" त्याने ह्या दौऱ्यातून माघार घेतली.    

त्यानंतर त्वरित, पटियालानेसुद्धा 'राज्यातील तातडीच्या गोष्टींचे' कारण देऊन आलेल्या संधीवर पाणी सोडलं. 

आता नवीन 'महाराजा' शोधणं आलं. मग पोरबंदरच्या महाराजाला भारताच्या ह्या पहिल्या दौऱ्याचं कप्तानपद दिलं गेलं. 

नवीन आलेला महाराजा हुशार होता आणि त्याला स्वतःच्या कौशल्याची पूर्ण जाणीव होती. स्वतःचं हसं करून घेण्यापेक्षा त्याने कप्तानपद सोडलं आणि १००% पात्र असलेला एक सामान्य नागरिक सीके नायडू भारताच्या पहिल्या टेस्ट मॅचचा कप्तान झाला. तेवढंच नाही, जेव्हा इंग्लिश टीम भारतात आली तेव्हा सुद्धा ३ टेस्टमध्ये भारताचं नेतृत्व केलं. 

"सी. के. नायडूचा अपमान करा आणि टेस्ट कॅप मिळावा" स्कीम

१९३६ पर्यंत व्हिझीने आपले पत्ते बरोबर खेळले होते. विदेशी खेळाडूंना भारतात खेळायला बोलवून, त्यांना रॉयल ट्रीटमेंट देऊन, मुलीगाटॉनी सुप खायला घालून, मोठ्या मोठ्या शिकारींना घेऊन जाऊन आणि व्हिस्कीच्या छोट्या छोट्या पेगचं वंगण लावून अशी काही फिल्डिंग लावली कि सगळ्यांना असं वाटायला लागलं कि व्हिझी हाच परफेक्ट माणूस आहे कप्तान व्हायला. वाचून आश्चर्य वाटेल पण ज्यांनी व्हिझीला मदत केली त्या नावांमध्ये जॅक हॉब्स आणि हर्बर्ट सटक्लिफ ही दोन महान नावंही होती. 

सत्य हेच होतं कि व्हिझीचं क्रिकेट कौशल्य अगदीच सुमार होतं. आणि त्यात तो लहरी, सत्तेचा हव्यास असलेला आणि पक्षपाती माणूस होता. कमी बॅटिंग ऍव्हरेज, मुर्खासारखी फिल्ड प्लेसमेंट, ठरलेली बॅटिंग ऑर्डर नाही हे सगळं इंग्लिश पत्रकारांना कळत होतं. जे खरंच पत्रकारिता करायला आले होते, ते हे सगळं छापत होते. पण त्यात अनेक असेही होते ज्यांना व्हिझीकडून महागडी घड्याळं भेटवस्तू म्हणून मिळाली होती. 

स्टार प्लेअर सीके नायडूला हे सगळं जे चालू होतं ते आवडत नव्हतं आणि हे च राजकुमारांना रुचलं नाही. त्या वेळचा सगळ्यात प्रसिद्ध भारतीय खेळाडू सीके आणि त्याने १९३२ साली कप्तानपद निभावलं होतं. आणि त्यामुळे व्हिझीचा जळफळाट होत होता. इकडे स्वतः राजकुमारसाहेब असताना सामान्य माणसाला एवढं महत्व का? 

बाका जिलानी नावाचा एक अति-सुमार मध्यगती गोलंदाज होता. पण त्याचं भाग्य फळफळलं जेव्हा व्हिझीने त्याला स्वतःच्या मनसुब्यांना कार्यकारणी लावायच्या कामगिरीवर नियुक्त केलं. व्हिझीने त्याला 'टेस्ट कॅप'चं आमिष देऊन ब्रेकफास्टच्या वेळी नायडूचा सगळ्यांसमोर अपमान करायला सांगितलं. 

 पडत्या फळाची आज्ञा मानून जिलानीने नायडूला शिव्या हासडल्या. आणि ओव्हल मैदानावर डेब्यू केला. पूर्ण मॅचमध्ये त्याने एकूण १६ धावा केल्या आणि ५५ धावा देऊन एकही विकेट घेतली नाही. आणि अपेक्षेप्रमाणे भारत ९ विकेट्सने मॅच हरला. 

अमरनाथ प्रकरण

व्हिझीने आत्तापर्यंत केलेले कांड अगदीच किरकोळ वाटतील असं अजून एक मोठं कांड केलं. आणि त्यातून ते कांड केलं ह्या दौरावरच्या बेस्ट परफॉर्मर बरोबर - लाला अमरनाथ (मोहिंदर अमरनाथचे वडील).

दौरा सुरु झाल्यावर लगेच व्हिझीने २४ वर्षांच्या अमरनाथला बाजूला बोलवून घेतलं आणि नायडूबद्दल चेतावणी दिली. लाला अमरनाथ ज्याने भारताचं पहिलंवहिलं १०० केलं होतं १९३३ ला, त्याने पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे व्हिझीची बाजू घ्यायची हमी दिली. व्हिझी खूप खुश झाला. आणि जेव्हा अमरनाथने नॉर्थहॅम्पटनशायर विरुद्ध शतक ठोकलं तेव्हा तर व्हिझीने त्याची इतकी वाहवा केली! आणि त्याला रोज मैदानावर यायला गाडी पाठवला लागला. 

पण हे आनंदाचे क्षण खूप काळ टिकले नाहीत. लेस्टरशायर विरुद्ध मॅचमध्ये अमरनाथ बॉलिंग करत असताना त्याला हवी असलेली फिल्ड प्लेसमेंट करायला व्हिझीने नकार दिला आणि त्यानंतर रागात अमरनाथला मैदानाबाहेर जायला सांगितलं. 

हे सगळं झाल्यावर व्हिझीला कुठून तरी कुणकुण लागली कि अमरनाथ टीममधल्या दुसऱ्या लोकांबरोबर डावपेच रचतोय. त्याने लगेच अमरनाथला बोलवून घेतलं आणि बजावलं कि मी राजा आहे, मला जे पाहिजे ते मी करू शकतो. अमरनाथने पण आपल्या खास पंजाबी ढंगात व्हिझीला सांगितलं कि काय करायचं ते कर! दुसऱ्या प्लेअरचा अपमान केला तर बघून घेईन! 

हे ऐकून व्हिझीने टीमचा मॅनेजर मेजर ब्रिटेन-जोन्सला तक्रार केली. मेजरने अमरनाथला ताबडतोब व्हिझीची माफी मागायला सांगितली. आणि त्या बदल्यात त्याला लॅन्केशायर लीगच्या कॉन्ट्रॅक्टचं आमिष दिलं. अजून क्रिकेट खेळायला मिळणार म्हटल्यावर अमरनाथने पण पटकन माफी मागितली. 

पण, एवढ्याने व्हिझीचं मन भरलं नाही. लॉर्ड्सवर मिडलसेक्स विरुद्ध अमरनाथला लांबवर फिल्डिंगला पाठवलं आणि जास्त ओव्हर्स पण दिल्या नाहीत. असं असूनसुद्धा अमरनाथने २९ धावांत ६ विकेट्स पटकावल्या. आणि ह्या अष्टपैलु खेळाडूने एसेक्स विरुद्ध दोन्ही डावांत शतक ठोकून जबरदस्त उत्तर दिलं.   

ह्या दरम्यान अमरनाथच्या पाठीला थोडी दुखापत झाली. असं असूनही हा व्हिझी त्याला डीपमध्ये फिल्डिंगला पाठवायचा आणि ब्रेक न देता बॉलिंग करायला लावायचा. अमरनाथने हे अमीर इलाही आणि बाका जिलानीला सांगितल्यावर, मॅनेजरने लगेच त्याला सक्त ताकीद दिली. एवढंच नाही तर ह्या मेजरने अमरनाथवर 'वूमनाइसर' असल्याचे आरोप केले जे अमरनाथ क्षणात अमान्य केले. 

ह्या प्रकरणाचा अंत तेव्हा आला जेव्हा भारत मायनर कॉऊंटीसबरोबर मॅच खेळत होता. अमरनाथ चौथ्या क्रमांकाला बॅटिंगला जाणार होता आणि पॅड लावून तयार होता. पण दुसरी विकेट पडल्यावर व्हिझीने अमर सिंगला बॅटिंगला धाडलं. अमरनाथ पॅड लावून वाट बघत बसला पण शेवटची १० मिनिटं राहिली असताना, पाचवी विकेट पडल्यावर व्हिझीने त्याला बॅटिंगला जायला सांगितलं. १० मिनिटं खेळून अमरनाथ जेव्हा आत आला तेव्हा मात्र त्याचा पारा चढलेला होता. पॅड, बॅट बाजूला फेकून जोरात पंजाबीमध्ये त्याने कानाला झिणझिण्या आणणाऱ्या शिव्या हासडल्या. 

मॅच संपल्यावर लगेच, ब्रिटेन-जोन्सने बाकीच्या काही खेळाडूंकडून लिहून घेतलं कि अमरनाथने गैरवर्तणूक केली आहे. आणि त्याने अमरनाथला भारतात परत पाठवण्याचा निर्णय घेतला. लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी निघणाऱ्या कैसर-इ-हिंदवर सगळी व्यवस्था केली गेली.  

कोटा रामास्वामी, वझीर अली, सीके नायडू आणि दत्ताराम हिंदळेकर ह्या खेळाडूंनी जाऊन व्हिझीला विनंती केली. पण राजकुमारांचा 'इगो' आड आला आणि अमरनाथ आपला एकटा भारतात परत आला.

हे सगळं प्रकरण भारतात खूप दिवस चाललं. सगळ्या डिसिप्लिनरी कमिट्यांमध्ये, बोर्ड आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या वादामध्ये, व्हिझीच्या विरोधाभासी विधानांमध्ये, भारत आरामात सिरीज हरला. व्हिझी एक निकृष्ट कप्तान आणि त्याहून जास्त बॅट्समन ठरला. राजकुमारांनी दौऱ्यावर जेवढ्या धावा केल्या त्याहून जास्त रोल्स रॉईस त्यांनी इंग्लंडमध्ये असताना खरेदी केल्या! व्हिझीने इतके पैसे इंग्लंडमध्ये खर्च केले कि त्यांनी भारावून त्याला 'सर' किताब दिला! धोनी कसा एकमेव खेळाडू आहे कि जो खेळत असताना त्याचा बायोपिक आला, तसाच व्हिझी हा एकमेव खेळाडू आहे ज्याची कारकीर्द चालू असताना त्याला नाईटहूड मिळालं.  

जानेवारी १९३७ मध्ये ब्युमोंट कमिटीच्या रिपोर्टनुसार व्हिझीचं कप्तानपद एक अनर्थ होता. रिपोर्टमध्ये नमूद केलं होतं कि "व्हिझीला फिल्ड प्लेसमेंट, बॉलिंग चेंजेस काय असतं तेच कळत नाही. बॅटिंग ऑर्डर वगैरे गोष्टी तर त्याला झेपल्याच नाहीत". 

अमरनाथ परत भारतीय टीम मध्ये आला आणि एवढंच नाही तर नंतर कप्तानसुद्धा झाला. व्हिझी मात्र ह्या नंतर कधीच भारतासाठी खेळाला नाही. 

Comments