पर्थमध्ये - एका ताऱ्याचा उदय...

क्रिकेटवरच्या माझ्या ह्या नवीन ब्लॉगची पहिलीच पोस्ट! काय लिहावी ह्याचे खूप विचार मनात घोळत होते. शेवटी पहिला डाव देवाचा हा क्रिकेटमधला अलिखित नियम मानून, हि पोस्ट आपल्या सर्वात लाडक्या देवाला! 

पर्थ, ऑस्ट्रेलियाबद्दल माझ्या मनात एक वेगळाच सॉफ्ट कॉर्नर आहे. एक म्हणजे मी स्वतः गेली १४ वर्ष पर्थमध्ये राहतोय आणि दुसरं म्हणजे, वानखेडे सोडलं तर लहानपणी अजून कोणत्या खेळपट्टीचं आकर्षण होतं ते म्हणजे पर्थ. ऑस्ट्रेलियातल्या सगळ्या शहरांमध्ये पर्थ भारताच्या सगळ्यात जवळ आहे. आणि अडीच तासच पुढे आहेत. त्यामुळे लहानपणी अगदीच ब्राम्ह-मुहूर्तावर उठावं लागायचं नाही. ७ ला उठून पटकन टीव्हीसमोर बसलं तरी चालायचं. सिडनी, मेलबॉर्नच्या मॅचेस बघायला अगदीच उजाडायच्या आधी डोळे किलकिले करून बसावं लागायचं.    

वाकाच्या त्या पीचचा स्पीड आणि बाउन्स! चॅनेल नाईनचे ते अफलातून कॅमेरे! ऑस्ट्रेलियामधल्या मॅचेस बघताना वेगळीच मजा यायची. वेंकटेश प्रसादसुद्धा ब्रेट ली सारखा वाटायचा. रिची बेनौची ती 'ठेहराव'वाली कॉमेंटरी एक काहीतरी वेगळंच गूढ वातावरण निर्मिती करायची.   

भारताच्या ह्याच सगळ्या ऑस्ट्रेलिया टूरपैकी एक टूर होती १९९१-९२ ची. मी जेमतेम ७ वर्षांचा होतो. बाबांमुळे बऱ्यापैकी क्रिकेट समजत होतं. आणि त्या टूरला एक समजलं होतं कि पर्थ हे पीच नाहीये जिकडे तुम्ही दमलेले बॉलर्स आणि ०-३ अशी स्कॉरलाईन घेऊन जाल. आणि भारताने नेमकं तेच केलं होतं. ऑस्ट्रेलियाने अपेक्षेप्रमाणे धुव्वा उडवला होता भारताचा! पण ह्या सगळ्या वाताहतीतसुद्धा एक आशेचा किरण दिसत होता - ती एक इंनिंग, ज्यांनी ती पाहिली आहे ते शप्पथ घेऊन सांगतील! सचिन तेंडुलकर, कोवळ्या १८ वर्षांचा, त्याने अशी सेन्चुरी केली कि अनेक निःसंकोचपणे सांगतील कि ती क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तमपैकी एक होती! 

सचिनच्या त्या अद्भुत ११४ धावांच्या खेळीनंतर प्रसिद्ध इंग्लिश पत्रकार पीटर रोबक ह्याने 'सिडनी मॉर्निंग हेराल्ड'मध्ये भला मोठा लेख लिहिला होता. मी विचार केला कि ह्या लेखाचं मराठी भाषांतर करून अनेकांपर्यंत पोहोचवावं. सचिनच्या ४९व्या वाढदिवसाला माझ्या कडून हि छोटीशी भेट. 

*****

कधी कधी एखाद्या ठिकाणी नुसतं असणं हेच एक अहोभाग्य असतं. काल, पर्थ तसाच एक क्षण होता. सचिन तेंडुलकरला बॅटिंग करताना बघणं, त्या दोन तासांसाठी म्हणजे आपल्या निरस, सामान्य जगातून निघून अश्या एका दूरच्या, जादुई आणि अशक्य जगात जाणं जिकडे हा निव्वळ १८ पावसाळे बघितलेला पोरगा अशी बॅटिंग करतो कि क्वचितच कोणत्या माणसाने तशी केली असेल. 

एक विशिष्ट शॉट, स्मृतींमध्ये खूप वेळ रेंगाळत राहील. माईक व्हिटनी, काहीस वेगात किंचित आखूड टप्प्याचा आणि मिडल स्टॅम्पजवळ तो बॉल होता. तेंडुलकर क्षणात बँक फुटवर गेला आणि मिड ऑनच्या बाजूने स्ट्रेट ड्राईव्ह केला. असा शॉट ज्याला विलक्षण टाईमिंगची गरज होती, उच्च दर्जाचा असा तो शॉट. यापूर्वी, अगदी सुरुवातीपासून, क्वचितच असे खेळाडू आहेत कि ज्यांनी टेस्ट मॅच सोडा, आपली टीम संकटात असताना, असा शॉट खेळायचं लांब, त्याचा विचारही केला नसता. 

ह्या पूर्ण उन्हाळी दौऱ्यात, तेंडुलकर त्याच्यात काहीतरी स्पेशल आहे अशी खात्री देतोय - काही पुरावे कि तो जसा दिसतोय तसाच आहे, या पृथ्वीतलावरच्या सर्वोत्कृष्ट बॅट्समनपैकी एक. सिडनी वाईट नव्हतं, पण एकदाच करून पुरेसं देखील नव्हतं आणि तसंही, सिडनीचं पीच स्लो होतं आणि ब्रूस रीड जायबंदी होता. तेंडुलकरने स्पिनची कत्तल केली, पण आता तो सामना करत होता असा वेग आणि अशी उसळी जी त्याने लहानपणापासून बघितलीसुद्धा नव्हती.

पर्थमध्ये त्याची बॅटिंग स्वतःमध्येच एक मास्टरी होती विशेषतः काहीही किंचितही आखूड टप्प्याचं असेल तर त्याचे कट शॉट्स, आणि त्याचे स्ट्रेट ड्राईव्ह, आणि त्याचे ते बिनचूक पॅडवरून मारलेलं फ्लिक्स - सगळं सगळं महान होतं. 

त्याचं रँनिंग बिटवीन द विकेट्ससुद्धा, चपळ आणि अचूक. जसं काही जितक्या पटकन तो प्रत्येक बॉल हेरतो, तितक्याच पटकन तो प्रत्येक रनसुद्धा हेरतो. धावणंसुद्धा तो दुपट्यात असताना शिकून आलाय. बहुदा त्याचे पहिले शब्द होते: "येस.. नो" आणि "मेहेरबानी करून सरळ खेळ". 

तेंडुलकरने दाखवून दिलं कि, ना वेगवान बॉलिंगला ना उसळत्या चेंडूंना, तो कशालाच घाबरत नाही. आणि अस्सल बाउन्स असलेल्या ह्या पीचवर तर नाहीच नाही. त्याला बरोबर माहित होतं कि कोणते बॉल सोडून द्यायचे जे त्याच्या संघातील सहकाऱ्यांना कळलं नाही. इथे बॅटिंग करायची हे त्याला इतकं माहित होतं कि जणू काही त्याच्या जन्मच इकडे झालाय.  

संपूर्ण दौऱ्यात त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध संघर्षाचं आव्हान लीलया पेललं, आणि ह्या संघर्षाचा आनंद घेतला, आनंद घेतला ह्या इकडच्या ह्या कठीण परिस्थितींचा कारण काहीही झालं तरी तो एक धाडसी क्रिकेटपटू आहे. १५ वर्षांचा असताना तो अगदी निराश झाला होता जेव्हा त्याला कॅरिबियनच्या दौऱ्यातून वगळण्यात आलं. सगळॆ १५ वर्षीय असे नसतात ज्यांना पॅट्रिक पॅटर्सन आणि कर्टली अँब्रोसला धैर्याने तोंड द्यायचं आकर्षण असतं. 

 तांत्रिक कौशल्यांबरोबर कणखरपणा हि ह्या उस्तादाची वैशिट्य आहेत, आणि त्यांची उपस्थिती हेच दाखवते कि एक दिवस हा शक्तिशाली लिडर होणार. त्याच्या कप्तानाने कमजोर शॉट खेळून स्वतःची विकेट गमावल्यावर त्याने जो जळजळीत कटाक्ष टाकला कि त्यावरून हेच दिसतं कि तो एक धाडसी प्रतिस्पर्धी आहे आणि तो त्याच्या संघ-सहकाऱ्यांकडूनही तीच अपेक्षा ठेवतो. मनोज प्रभाकरच्या बेपर्वा बॉलिंगने, किंवा कपिल देवच्या सारख्या लॉन्ग लेगवर मारलेल्या हवेतल्या फटक्यांनी त्याची झालेली चिडचिड बघून लगेच कळतं कि ह्या माणसाला चांगलं क्रिकेट माहिती आहे आणि त्याला आपल्या टीमची अतीव काळजी आहे. हा एक असा खेळाडू आहे कि जो त्याच्या जबाबदारीही इतका प्रामाणिक आहे जितका तरुण विवियन रिचर्ड्स. 

तेंडुलकरच्या ह्या धीट आणि अभिमान वाटेल अश्या प्रयत्नांनी संघातल्या बाकीच्यांना लाजा वाटल्या असतील. ते प्रयन्त जे लंचनंतर संपले, आणि योग्य वेळीच कारण कधी नव्हे ते पहिल्यांदा तेंडुलकरने पटापट धावून चार धावा काढण्याऐवजी दमून हळू हळू तीन धाव काढल्या. 

स्पष्टपणे, त्याला बॉलिंग खेळून काढायची होती पण ह्या आधी त्याने प्रत्येक धाव तिच्या योग्यतेनुसार काढली. शेवटी एकाग्रता ढळली आणि मायाजाल तुटलं.  

तेंडुलकरच्या ह्या खेळीत सगळ्या प्रकारचे संदेश होते. स्पष्टपणे, बाकी सहकारी ब्रिस्बेनपासून सुधारलेच नव्हते, भारतीय क्रिकेटसाठी नवीन रक्ताची वेळ आता आली आहे. 

खरं तर त्याच्या बॅटिंगमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सांत्वनात्मक असं काहीच नव्हतं कारण ह्या संपूर्ण दौऱ्यात ज्या ३ अविस्मरणीय अशा खेळी आहेत - सगळ्या भारतीयांकडूनच. 

एक शेवटचा विचार. तेंडुलकरला सध्या ऑस्ट्रेलियाने संघात घेतलं असतं का? 

शिल्डचे वेळापत्रक इतकं धक्कादायक आहे कि १८ वर्षाचा काय, कोणालाच संघात येणं कठीण आहे. आणि तसंही, शेवटच्या १० पैकी ८ डावांत फेल गेलेल्या बॅट्समनला काढल्यावर झालेली अनावश्यक गडबड बघता, हि एक अचंबा व्यक्त करण्याची गोष्ट आहे कि जर सिलेक्टरनी आता परत कोणाला ड्रॉप केलं तर. 

*****

मूळ लेख -  In Perth a star is born - Peter Roebuck for Sydney Morning Herald, 04 February 1992. 

Comments

Popular Posts