विजयी भव: भाग १ - द मर्चंट ऑफ मुंबई...

'विजय' ह्या शब्दाला जगात खूप महत्व आहे. क्रिकेटमध्ये तर इतकं कि, किती विशेषणं वापरू तेवढी कमी. 'रोमहर्षक विजय', 'चुरशीचा विजय', 'थरारक विजय', 'निसटता विजय' इत्यादी. शेवटी विजय-पराजयावर सगळं क्रिकेट अवलंबून आहे. 

पण, जर ह्या विजय-पराजयात ज्यांचा वाटा आहे ते च स्वतः 'विजय' असतील तर... 

आपण अश्याच काही 'विजयांबद्दल' बोलूया ज्यांनी भारतीय क्रिकेटच्या अनेक विजयांमध्ये मोलाची कामगिरी केली. 'विजयी भव' हि सिरीज करण्याचा मानस आहे कारण एकाच 'विजयावर' आपण कधीच समाधानी नसतो. आपल्या ह्या सिरीजचा ओपनर आहेत भारताचे पहिले वर्ल्ड क्लास ओपनिंग बॅट्समन - विजय माधवजी ठाकरसी. पण क्रिकेट जगतात ते ज्या नावाने प्रसिद्ध आहेत ते म्हणजे,   

विजय मर्चंट 

जर बॅटिंगचा मापदंड सर डॉन ब्रॅडमन मानले तर वेस्ट इंडिजचे जॉर्ज हेडली हे 'द ब्लॅक ब्रॅडमन' होते आणि विजय मर्चंट होते 'ब्रॅडमन ऑफ द इस्ट'. ज्यांचा फर्स्ट क्लास ऍव्हरेज फक्त ह्याच डॉन ब्रॅडमनपेक्षा कमी आहे. १५० फर्स्ट क्लास मॅचेसनंतर अवाढव्य अश्या १३,४७० रन्स! आणि थक्क करणारी गोष्ट म्हणजे त्यात ४५ शतकं आणि ५२ अर्ध-शतकं होती आणि ऍव्हरेज होता ७१.६४!

विजय मर्चंट लहान असल्यापासूनच क्रिकेट खेळायला लागले. बॉम्बे स्कूल आणि कॉलेज क्रिकेटमधले ते तत्कालीन सर्वोत्तम बॅट्समन होते. १८ वर्षांचे असल्यापासूनच सगळीकडे त्यांच्या नावाची चर्चा व्हायला लागली होती. १९२९ ला बॉम्बे क्वाड्रंग्युलरमध्ये त्यांना हिंदू जिमखानाच्या टीममध्ये घेतले गेले. १९३२ मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ (Civil Disobedience Movement) चालू झाली आणि हिंदूंच्या टीमने निर्णय घेतला कि आमचा कोणीही खेळाडू १९३२च्या इंग्लंडच्या दौऱ्याला जाणार नाही. त्यामुळे मर्चंट यांचा तो दौरा मुकला. पण १९३३ मध्ये इंग्लंडची टीम भारतात आली आणि मर्चंट बॉम्बेमध्ये होणाऱ्या पहिल्या टेस्टसाठी मिडल ऑर्डर बॅट्समन म्हणून निवडले गेले. 

टेस्ट मॅचच्या एक आठवडा आधी बॉम्बे प्रेसिडेंसीकडून एम. एम. सी. च्या विरुद्ध खेळताना मॉरिस निकल्सचा एक फास्ट बाउन्सर मर्चंटच्या हनुवटीवर लागला. मर्चंट यांच्या हनुवटीपेक्षा मनाला जास्त लागलं आणि पुढचे अनेक आठवडे त्यांनी नेट्समध्ये बाउन्सरची प्रचंड प्रॅक्टिस केली. असं म्हणतात ह्याच्यानंतर मर्चंट ह्यांना फास्ट बॉलिंगचा कधीच त्रास झाला नाही. इंग्लिश कॅप्टन डग्लस जार्डीन म्हणाला होता कि 'मर्चंट हा भारताचा सगळ्यात खणखणीत बॅट्समन आहे'.   

१९३६ मध्ये भारताने इंग्लंडचा एक दौरा केला. त्यावेळी भारतीय क्रिकेटशी निगडित सगळ्यांचं हे मत होतं कि, तांत्रिकदृष्ट्या विजय मर्चंट हे सर्वोत्तम बॅट्समन आहेत. दौर्यावरच्या फर्स्ट क्लास मॅचेस मधलं त्यांचं उत्तम प्रदर्शन बघून, मर्चंट यांना टेस्ट मॅचेससाठी ओपनिंग बॅट्समन म्हणून निवडलं गेलं. इंग्लंडच्या मजबूत बॉलिंगचा सामना त्यांनी तीनही मॅचेसमध्ये खूप निडरपणे केला आणि ह्या सिरीजमध्ये भारताकडून सर्वाधिक रन्स बनवल्या. 

मँचेस्टर टेस्ट मध्ये दबावाखाली खेळताना त्यांनी एक मोठी इंनिंग खेळली आणि सय्यद मुश्ताक अलींबरोबर २०३ रन्सची पार्टनरशिप केली. ह्या पार्टनरशिपनंतर मर्चंट आणि मुश्ताक यांचं नाव भारताची सर्वोत्तम ओपनिंग पेअर म्हणून लोक घेऊ लागले. जगातल्या सर्वश्रेष्ठ क्रिकेट लेखकांपैकी एक नेव्हिल कार्डस यांनी लिहून ठेवलंय कि, 'Mushtaq is a poetry & Merchant is a prose'. 

१९३६ च्या ह्या कामगिरीने मर्चंट यांना 'विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर' किताब दिला गेला. इंग्लिश क्रिकेटर सी. बी. फ्राय यांनी विधान केलं कि "मर्चंटना पांढरा रंग लावा आणि आपल्या बरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी घेऊन चला".

दुसऱ्या विश्वयुद्धामुळे १० वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट होऊ शकले नाही आणि मर्चंट डोमेस्टिक क्रिकेटमध्ये व्यस्त झाले. रणजी ट्रॉफी मध्ये ते खूप वर्ष बॉम्बे टीमचे कॅप्टन होते. बॉम्बे क्रिकेट पहिल्यापासून तुम्हाला सांगतं कि विकेट टाकू नका, पीचवर जम बसवा. थोडक्यात जी 'खडूस' बॅट्समनशिप म्हणतात त्याची परंपरा मर्चंट यांनी सुरु केली. ते नेहमी म्हणायचे कि "The art of the opening batting is leaving the ball and not playing". 

१० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीने तो क्षण आला ज्याची सगळे भारतीय वाट बघत होते. १९४६ मध्ये इंग्लंडचा दौरा घोषित केला गेला. ह्या दौऱ्याच्या प्रॅक्टिससाठी मर्चंट सकाळी ६ वाजता सी. सी. आय. च्या नेट्स मध्ये जायचे. ६ वाजता जायचं कारण म्हणजे सकाळी दव पडलेलं असायचं आणि ओल्या बॉलचा स्विंग, बाउन्स ह्या सगळ्याचा ते नीट अभ्यास करायचे. एवढंच नाही तर हिंदू जिमखानाच्या पिचवर त्यांनी अनेक बादल्या पाणी टाकून त्यात बॅटिंग प्रॅक्टिस केली. एवढ्या वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून सुद्धा त्यांनी केलेल्या प्रॅक्टिसेसने आणि परिश्रमांमुळे, ह्या दौऱ्यावर ते भारताचे सर्वश्रेष्ठ बॅट्समन ठरले. २६ फर्स्ट क्लास मॅचेस मध्ये ७५ च्या सरासरीने २३८५ रन्सचा डोंगर रचला. त्यात २ द्विशतकं, ५ शतकं होती. इंग्लिश बॉलर्स बॉलिंग करत गेले आणि मर्चंट त्यांचा धिटाईने सामना करत गेले. 

ह्या दौऱ्यावरून परत आल्यावर मर्चंट यांची तब्येत हळू हळू ढासळायला लागली. स्वतंत्र भारताचा १९४७-४८ चा पहिला दौरा ऑस्ट्रेलियाला होता. दुर्दैवाने ते ह्या दौऱ्याला जायला आणि ब्रॅडमन विरुद्ध खेळायला मुकले.

१९५१ ला मर्चंट इंग्लंडविरुद्ध त्यांच्या आयुष्यातील शेवटची टेस्ट मॅच खेळले. ह्या टेस्ट मध्ये ओपनिंग बॅटिंग करताना त्यांनी त्यांचा हायस्ट टेस्ट स्कोर बनवला -  १५४! ह्या मॅचमध्ये त्यांनी भारताचे कॅप्टन आणि आपल्या 'विजयी भव' सीरिजचे दुसरे 'विजय', विजय हजारे ह्यांच्याबरोबर २११ रन्सची पार्टनरशिप केली. 

वयाच्या ४०व्या वर्षी, १० आंतरराष्ट्रीय टेस्ट मॅचेस खेळून मर्चंट रिटायर झाले. १८ वर्ष चाललेल्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी १० टेस्टमध्ये ८५९ रन्स केल्या. ४७ रणजी ट्रॉफी मॅचेसमध्ये १६ शतकं आणि ३६३९ रन्स आणि अचंबित करणारा ९८.७५ चा ऍव्हरेज! नंतर मर्चंट ह्यांनी क्रिकेट प्रशासक, लेखक, प्रसारक अश्या अनेक भूमिका बजावल्या. पण क्रिकेटमधून रिटायर होताना ओपनिंग बॅट्समनची जी पोकळी ते सोडून गेले ती भरायला तब्बल २० वर्ष लागली. विनू मंकड, पंकज रॉय काही काळ टिकले, पण ती पोकळी खरी भरून काढली अजून एका मुंबईच्या खडूस बॅट्समनने - सुनील मनोहर गावसकर. 

७६ वर्षांचे होऊन २७ ऑक्टोबर १९८७ रोजी मर्चंट यांचे मुंबई येथे निधन झाले.  

स्रोत: https://www.espncricinfo.com/

Comments

Popular Posts