श्रीगणेशा...

शीर्षक वाचून असं वाटेल की ब्लॉगची सुरुवात तर कधीच झाली आहे तर आत्ता परत का? घाबरु नका. आपल्या ह्या लाडक्या क्रिकेट खेळाचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा श्रीगणेशा कसा झाला ह्याबद्दल अनेकांना प्रश्न पडतात, तर ही पोस्ट खास त्याच्यासाठी. 

अनेकांचा हा समज आहे की पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ह्यांच्यात खेळली गेली. हे काही प्रमाणत बरोबर आहे पण पूर्णतः नाही. अधिकृत म्हणजे आपल्या सामान्य मराठी भाषेत ज्याला ऑफिशियल असं म्हणतात ती मॅच इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया हीच होती, जी १८७७ साली मेलबोर्नला खेळली गेली. पण वाचून आश्चर्य वाटेल, पहिलीवहिली आंतरराष्ट्रीय मॅच खेळली गेली ती अमेरिकेत! 

कॅनडाच्या क्रिकेट टीमने १८४४ साली अमेरिकेचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात २४ ते २६ सप्टेंबर १८४४ ला सेंट जॉर्ज क्रिकेट क्लब, न्यूयॉर्क येथे अमेरिका विरुद्ध कॅनडा मॅचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा केला. ह्या मॅचला वर्तमानपत्रांनी अमेरिका विरुद्ध ब्रिटिश साम्राज्याचं कॅनडा अशी प्रसिद्धी दिली होती. 

कॅनडा ही मॅच २३ धावांनी जिंकली. पहिल्या दिवशी ५००० ते २०,००० दर्शक हजर होते आणि अंदाजे १,००,००० ते १,२०,००० डॉलर्सच्या बेट्स लागल्या गेल्या.

ह्या मॅचचं बी चार वर्षांपूर्वीच रोवलं गेलं होतं, जेव्हा सेंट जॉर्ज क्रिकेट क्लब टोरोंटोला बस आणि मग बोट असा खडतर प्रवास करून गेला होता. 

एक कोण श्रीयुत फिल्लपोत्स होते ज्यांनी सेंट जॉर्ज क्रिकेट क्लबला क्रिकेट खेळण्यासाठी टोरोंटो क्रिकेट क्लबकडून आमंत्रण दिले होते. पण जेव्हा १८ जणांचा हा संघ १८ ऑगस्ट १८४० ला टोरोंटोला पोहोचला, कॅनडाच्या लोकांना धक्काच बसला. झालं असं की जे श्रीयुत फिल्लपोत्स होते ज्यांनी आमंत्रण दिलं होतं, ते टोरोंटो क्रिकेट क्लबचे सेक्रेटरी जॉर्ज फिल्लपोत्स नव्हतेच तर कोणीतरी तोतया होता. 

जरी हे थट्टेचं आमंत्रण असलं, तरी खटाटोप करून पटकन एक क्रिकेट मॅच आयोजित केली गेली आणि अनेक दर्शकांनी त्याला हजेरी लावली. एवढंच नाही, एक ब्रास बँड आणि अपर कॅनडाचे गव्हर्नर सर जॉर्ज आर्थर हे ही उपस्थित होते. सेंट जॉर्ज क्रिकेट क्लबने ही मॅच १० विकेट्सने जिंकली आणि खूप चांगल्या आदरतिथ्याने खुश होऊन कॅनडाला, क्लब नाही तर आंतरराष्ट्रीय मॅच खेळण्यासाठी आमंत्रण दिलं. 

अमेरिकेची टीम फिलाडेल्फिया, वॉशिंग्टन, बोस्टन आणि न्यूयॉर्कच्या खेळाडूंनी बनवली गेली. तसंच कॅनडानेसुद्धा फक्त टोरोंटोच्या खेळाडूंशिवाय देशातील इतर खेळाडू गोळा करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना जास्त यश आलं असं कुठे नमूद नाही. पण असं मानलं जातं की कॅनडाची टीम टोरोंटो, ग्यूएल्फ आणि अपर कॅनडाच्या क्रिकेट क्लबच्या खेळाडूंनी भरलेली होती. लायब्ररीमध्ये सापडलेल्या पोस्टर आणि जाहिरातींमध्ये अमेरिका विरुद्ध कॅनडा अशीच नोंद आढळते, ना की न्यूयॉर्क विरुद्ध टोरोंटो. 

मॅच दोन दिवसांची ठरवली गेली होती. पहिल्या दिवशी अमेरिकेने नाणेफेक जिंकून बॉलिंग केली. त्यांनी कॅनडाचा डाव ८२ धावांत संपवला. हेन्री ग्रूमने ३ तर सॅम राईटने ५ विकेट्स पटकावल्या. मग कॅनडानेसुद्धा टीच्चून बॉलिंग केली आणि दिवसाअखेर अमेरिकेच्या ९ विकेट्स घेतल्या फक्त ६१ धावा देवून. 

खराब हवामानामुळे दुसरा दिवस वाया गेला. मग तिसऱ्या दिवशी खेळ चालू ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. अमेरिका फक्त ३ धावा काढून ६४ वर ऑल आऊट झाले. कॅनडाच्या डेव्हिड विंकवर्थ आणि फ्रेड फ्रेंच यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात कॅनडाने ६३ धावा केल्या आणि जिंकण्यासाठी अमेरिकेपुढे ८२ धावांचं आव्हान ठेवलं गेलं. कॅनडाच्या जॉर्ज शार्प याने ६ विकेट्स काढत अमेरिकेचा डाव फक्त ५८ धावांत संपवला आणि कॅनडाला २३ धावांनी विजय प्राप्त करून दिला. 

अमेरिकेचा जॉर्ज व्हीटक्रोफ्ट काही वैयक्तिक कारणांमुळे तिसऱ्या दिवशी उशिरा आला. अमेरिकेचा डाव संपून २० मिनिटं झाली होती आणि त्यांनी १० च बॅट्समन खेळवले होते. त्यांनी अंपायरबरोबर वाद घातला की व्हीटक्रोफ्टला बॅटिंग करू दे. कारण तो त्यांचा सर्वोत्तम बॅट्समन होता. पण कॅनडाने विरोध केला आणि ते शक्य झालं नाही. 

कॅनडा आणि अमेरिका मॅचेसची आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटची मुहूर्तमेढ रोवली गेली. १८४५ साली मोंत्रेआल, कॅनडा येथे पुढची मॅच आयोजित केली गेली. अजून पर्यंत ह्या परंपरेनुसार अमेरिका विरुद्ध कॅनडा मॅचेस आयोजित केल्या जातात. 

प्रसिद्ध क्रिकेट संख्याशास्त्रज्ञ बिल फ्रिंडेल याने लिहून ठेवलं आहे, "अमेरिकेने अनेक आंतरराष्ट्रीय टीम मैदानात उतरवल्या. त्यांची कॅनडा विरुद्धची वार्षिक लढत १८४४ पासून चालू आहे, जी इंग्लंड विरूद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या लढतीच्या ३३ वर्ष आधी आहे."

आता ह्या ब्लॉग पोस्टला श्रीगणेशा असं नाव दिलं खरं पण मूळ क्रिकेटचंच श्रीगणेशा कसं झालं त्याबद्दल एक पोस्ट येणार आहे. 'श्रीगणेशा द प्रिक्वल' लवकरच तुमच्या जवळच्या पडद्यावर (कॉम्प्युटर किँवा फोनच्या अर्थात)!

Comments

Popular Posts