विजयी भव: भाग २ - 'हजारांत' एक...

सर डॉन ब्रॅडमन, जॉर्ज हेडली, सर विवियन रिचर्ड्स, वीरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल, ए बी डी विलियर्स किँवा सध्याचा सूर्यकुमार यादव ह्यांसारखे बॅट्समन स्वतःच्या ताकदीने आणि स्फोटक फटाक्यांनी विरुद्ध संघांना नामोहरम करतात किँवा करायचे. आणि हे अगदी पटण्याजोगं आहे कारण, कुठल्याहि बॉलरला स्वतःची अशी धुलाई करून घेणं अजिबात आवडत नाही. आणि दुसऱ्या अनुषंगाने बघायला गेलं तर, हि त्या बॅट्समन्सची कसब आहे कि जेव्हा प्रतिस्पर्धी त्यांच्या संयम, एकाग्रता आणि धांवांची भूक याने हैराण होतात आणि त्यांना आऊट कसं करायचं ह्याचा प्लॅन करायला चुकतात. विजय सॅम्युएल हजारे असेच एक बॅट्समन होते. आपल्या विजयी भव सीरिजचे पुढचे अमूल्य विजय.


हजारे यांचा जन्म मार्च ११, १९१५ ला कृष्णाकाठी सांगलीमध्ये झाला. १९९५ साली बडोद्याला त्यांच्या घरी त्यांनी दिलेल्या एका दुर्मिळ मुलाखतीमध्ये त्यांनी गंमतीने म्हटले होते कि, "माझं जन्म वर्ष खूप महत्वाचं आहे, निदान क्रिकेटच्या दृष्टीने. १९१५ ला च दोन महान क्रिकेटर्सना आपण गमावलं - डब्लू जी ग्रेस आणि व्हिक्टर ट्रम्पर. बहुदा त्यांनी त्यांची इंनिंग संपवली कारण त्यांनी ऐकलं कि माझा जन्म झालाय." 

तर हजारे यांनी जोक करणं हे तसं दुर्मिळच. कारण त्यांची ओळखच होती ते म्हणजे मितभाषी, मृदू स्वभावाचे आणि विनम्र - असा स्वभाव जो त्यांच्या बॅटिंगशी सुद्धा मिळताजुळता होता, ज्यात ते स्वतःची इंनिंग उभी करायला थोडा वेळ घ्यायचे. पण जेव्हा ते पीचवर सेट व्हायचे त्यानंतर मात्र ते अशी बॅटिंग करायचे कि सुरुवातीचे ते हेच का असा प्रश्न लोकांना पडायचा. त्यांचे ऑफ ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, स्क्वेअर कट आणि पुल शॉट्स जणू काही कपाटातून गडगडत बाहेर पडायचे. 

१९९५ च्या मुलाखतीमध्ये हजारेंनी त्यांच्या वाढदिवसाबद्दल अजून एक किस्सा सांगितला, "तुम्हाला माहित्ये माझा जन्म ११ मार्चला झाला. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल कि माझ्या शेवटच्या टूरमध्ये (वेस्ट इंडिज १९५२-५३), माझा विरुद्ध कॅप्टन जेफ्री स्टोलमेयर ज्याचा जन्म सुद्धा ११ मार्चलाच झाला होता, त्याने आणि मी चौथ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी गयानामध्ये एकत्र वाढदिवस साजरा केला. हा एक दुर्मिळ योगायोग असेल की जेव्हा दोन कॅप्टन, हजार मैलांवर असलेल्या दोन वेगवेगळ्या देशांत जन्मलेले, एकाच दिवशी वाढदिवस साजरा करत होते, टेस्ट मॅच चालू असताना." 

उत्कृष्ट म्हणजे जवळजवळ वैज्ञानिक वाटेल अशी बॅटिंग शैली, भक्कम डिफेन्स आणि प्रोमेथिअस सारखा निर्धार हि काही वैशिष्ठय होती हजारेंच्या बॅट्समनशिपची. त्यांचे प्रसिद्ध समवयस्क खेळाडू विजय मर्चन्ट ह्यांनी म्हटले होते, "मी आज वर कुठला दुसरा भारतीय क्रिकेटर नाही बघितलाय ज्याची एकाग्रता हजारेंपेक्षा जास्त आहे. अत्यंत सरळ बॅटने खेळणारा माणूस, मग सिली मिड ऑन आणि सिली मिड ऑफ असू दे किंवा नसू दे. इतकं सरळ आणि समोर खेळायचे कि बॅटला बॉल लागून तिकडेच निपचून पडायचा. बॉलर्स किंवा जवळच्या फिल्डर्सच्या आवाजाने त्यांची एकाग्रता कधीच भंग झाली नाही. संयम हे जणू त्यांचं व्यक्तिमत्वचं होतं."

हजारेंना त्यांच्या विकेटचं मोल नेहमीच ठाऊक होतं. ते ऑल-विकेट, ऑल-वेदर खेळाडू होते मग ते फास्ट बॉलर्स असू दे वा स्पिनर्स. मर्चन्ट त्यांच्याबद्दल बोलताना अजून म्हणाले होते, "हजारे एकमेव भारतीय बॅट्समन आहेत जे मॅटिंग आणि टर्फ अश्या दोन्ही प्रकारच्या पीचवर तेवढेच चांगले खेळतात. जगात अजून एकमेव खेळाडू असा आहे जो हे करू शकतो तो म्हणजे जॅक हॉब्स. मी हजारेंना त्या सम पातळीवर ठेवेन." 

ह्यात काही आश्चर्य नाही आहे कि फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्ये हजारेंनी खोऱ्याने धावा केल्या. त्यांचे आकडेच त्यांची कहाणी सांगतात. ते स्वतः त्याच्या बॅटिंगच्या आकड्यांबद्दल विलक्षण अभिमानी होते. त्यांची क्रिकेटबद्दलची आत्मीयता आणि आकड्यांबद्दलचं प्रेम एवढं होतं कि, ३ दशकांनंतरसुद्धा त्यांना ते आकडे तोंडपाठ होते. 

हजारे मुलाखतीमध्ये सांगतात, "मी १९३४-३५ ते १९६० महाराष्ट्र आणि बडोदा ह्यांच्यासाठी रणजी ट्रॉफी खेळलो, आणि १९३८ ते १९४४ मध्ये बॉम्बे पेंटॅन्ग्यूलर. मी ३० ऑफिशिअल आणि २० 'अनऑफिशिअल' टेस्ट्समध्ये भारतासाठी खेळलो, आणि त्यात १४ टेस्ट्समध्ये कर्णधारपदहि नोंदवलं. फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्ये मी ६० शतकं केली, १८,४७० धावा केल्या आणि ५९५ विकेट्सही घेतल्या. १९३९-४० आणि १९४०-४१ साली रणजी ट्रॉफी जिंकलेल्या महाराष्ट्र संघाचा मी खेळाडू होतो. आणि मी एकमेव असा आहे जो बडोद्याच्या १९४३-४३, १९४६-४७, १९४९-५० आणि १९५७-५८ रणजी ट्रॉफी विजेत्या संघांत होता. टेस्ट्समध्ये १००० आणि २००० रन्सचा पल्ला पार करणारा मी पहिला भारतीय आहे." 

मुळात हजारेंसाठी रेकॉर्ड्स आणि आकडे इकडेच थांबत नाही. रणजी ट्रॉफीमध्ये तत्रिशतक मारणारे ते पहिले होते (३१६ महाराष्ट्र विरुद्ध बडोदा).  आणि २ त्रिशतक मारणारेसुद्धा ते पहिलेच होते. बॉम्बे पेंटेग्यूलरमध्ये हिंदूंविरुद्ध खेळताना त्यांनी मारलेले ३०९ एक विलक्षण इंनिंग होती. एक तर त्यांनी फक्त ४०० मिनिटात त्रिशतक ठोकलं आणि त्यांचा संघाचा एकूण स्कोर ३८७ होता. बॉलरच्या डोक्यावरून सरळ षटकार मारून त्यांनी ३०० पूर्ण केले होते. त्यांचा भाऊ विवेकबरोबर सहाव्या विकेटसाठी ३०० रन्सची पार्टनरशिप केली होती आणि त्यात विवेक ह्यांचा वाटा होता निव्वळ २१ धावांचा. 

१९४३-४४ मध्ये डोमेस्टिक क्रिकेटमध्ये १००० पेक्षा जास्त धावा करणारे ते भारतात पहिले होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या १००० पेक्षा जास्त धावा त्यांनी फक्त ४ मॅचेसमध्ये केल्या होत्या. १९४६-४७ साली बडोद्यासाठी खेळताना, होळकर संघाविरुद्ध गुल मोहम्मद ह्यांच्याबरोबरची ५७७ रन्सची भागीदारी संस्मरणीय आहे. 

टेस्टमध्ये दोन शतकं करणारे ते पहिले भारतीय होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एडलेडला १९४७-४८ साली. भारताचा जरी १ इंनिंग आणि १६ धावांनी पराभव झाला असला, तरी, हजारेंच्या २ शतकाचं मोल अफाट आहे. ऑस्ट्रेलियाने ६७४ धावांचा डोंगर उभा केला होता (ब्रॅडमन २०१, लिंडसे हॅसेट १९८ नाबाद, सिड बार्न्स ११२). हजारे (११६) आणि दत्तू फडकर (१२३) ह्यांच्या निडर खेळींनंतरसुद्धा भारताला फॉलो-ऑन चुकवता आला नाही. हजारेंनी मग दुसऱ्या इंनिंगमध्ये मारलेले १४५ आणि ते सुद्धा भडकलेल्या रे लिंडवॉल (१६.५ - ४ - ३८ - ७) विरुद्ध हे इतके कमाल आहेत कारण ६ भारतीय बॅट्समन तेव्हा खातंपण उघडू शकले नव्हते. 


फेरवेल टू क्रिकेट ह्या १९५० सालच्या आत्मचरित्रात ब्रॅडमॅनने म्हटलंय "हजारेंची बॅटिंग बघून मी खूपच प्रभावित झालोय. कुठलाही दुराग्रह न ठेवता मी कबूल करतो कि हजारेंची बॅटिंग बघता त्यांनी ग्रेट प्लेअरचा दर्जा मिळालाच पाहिजे." अजून एका ठिकाणी ब्रॅडमॅनने हजारेंची तुलना फ्रॅंक वॉरेल ह्यांच्याशीही केली. 

लिंडवॉल, कीथ मिलर ह्यांच्या विरुद्ध मारलेल्या ११६ आणि १४५ पेक्षा सुद्धा, हजारेंना त्यांनी मारलेल्या ३८ रन्स जास्त भावतात. १९५२ साली ओव्हलवर फ्रेड ट्रुमन, ऍलेक बेडसर, जिम लेकर आणि टोनी लॉक ह्यांच्या बॉलिंगचा सामना करत, ओल्या पीचवर हजारे यांनी मारलेले ३८ हि त्यांच्या मते त्यांची बेस्ट इंनिंग होती. ते म्हणतात, "प्रेशर, भयाण पीच आणि इंग्लंडची तुफान बॉलिंग बघता, ती खरंच माझी उत्कृष्ट इंनिंग होती."

हजारे नशीबवान होते कि त्यांना सुरुवातीला ऑस्ट्रेलियन स्पिनर क्लारी ग्रिमलेट कोच म्हणून लाभले. ह्या कोचने त्यांना एक कानमंत्र दिला, "तुझी बॉलिंग शैली बदलू नकोस. तू जे टाकतोस तेच टाकत राहा आयुष्यभर. जर कुठे लक्ष द्यायचं असेल तर ते तुझ्या बॅटिंगवर दे कारण त्यात तुझा खरा टॅलेंट लपलेला आहे."

सुरुवातीच्या काळात डी बी देवधर आणि सी के नायडू ह्यांचा हजारेंवर खूप प्रभाव होता. हजारे नेहमी म्हणायचे कि, "मी देवधर आणि नायडू ह्यांच्याकडून खेळ आणि कप्तानी ह्यांबाबतीत खूप शिकलो. सी के नायडू हे सर्वोत्कृष्ट कॅप्टन होते ज्यांच्याखाली मी खेळलो. ते नेहमी त्यांचं सर्वोत्तम योगदान द्यायचा प्रयत्न करायचे आणि मुख्य म्हणजे मैदानावर वा मैदानाबाहेर ते कुठलाही निरर्थकपणा खपवून घ्यायचे नाहीत."  

वयाच्या ८९व्या वर्षी, २००४ साली हजारेंचं बडोद्याला निधन झालं. मैदानावर आणि मैदानाबाहेर एक उत्तम जेंटलमन असलेले हजारे ह्यांनी क्रिकेटलासुद्धा जेंटलमन्स गेम म्हणूनच नेहमी बघितलं. विजय-पराजय ह्याला अवाजवी महत्व न देता, ते फक्त क्रिकेटच्या प्रेमापोटी खेळत राहिले आणि माणसांपेक्षा खेळ सर्वोच्च ह्या भावनेचा सदैव आदर केला.  


स्रोत: https://www.espncricinfo.com/


Comments

Popular Posts